गडब/सुरेश म्हात्रे
वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध गुटखा व मटका जुगार अड्डयावर शुक्रवार व शनिवारी असा सलग दोन दिवस छापा टाकण्यात आला. या छाप्यात 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री, वाहतूकीला बंदी असताना धाब्यावर बसवून बेकायदेशीररिता हा धंदा चालविला जात होता. वडखळ पोलिसांनी शनिवारी सकाळी काराव गाव हद्दीतील सर्व्हिस रोडवर दत्त साई एंटरप्रायजेस दुकानासमोर कारवाई केली. निळ्या रंगाच्या पिशवीतून केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखू असा एकूण चार हजार 840 किंमतीचा साठा तसेच 45 हजार रुपयांची गाडी जप्त केली. फरहाद नसरुद्दीन अंसारी (36) रा. वडखळ, असे या आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडखळ बस स्थानकाच्या मागील बाजूस मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात एक हजार 630 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये पाचशे, शंभर, दोनशे, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या 25 हून अधिक नोटा, पेन, वहीचा समावेश आहे. चंद्रभूषण जितेंद्र सिंह (वय 35) असे या आरोपीचे नाव आहे. तो वडखळ परिसरातील बोरीफाटा येथील रहिवासी असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस स्टेशन टीम सहायक पोलीस निरिक्षक जाधव, सहायक फौजदार भाग्यवान कांबळे, सहायक फौजदार महेश ठाकूर, पोलीस हवालदार प्रशांत देसाई, पोलीस हवालदार रुपेश कोंडे, पोलीस हवालदार सुमित मदने या पथकाने कारवाई केली आहे.