गडब/सुरेश म्हात्रे
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात जवळपास वीस हून अधिक अल्प वयीन मुलींवर अत्याचार करून त्यातील काही पीडित मुलींना गर्भवती केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या एका गावातील अल्प वयीन पीडित मुलगी हिचे तिच्या आत्याच्या मुलासोबत(अलिबाग )प्रेम संबंध होते.आरोपीच्या मामाने म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न अठरा वर्षांनंतर करून देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांच्या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नव्हती.
या दरम्यान अलिबाग तालुक्यातील आरोपी हा पीडित अल्प वयीन मुलीचा घरी येऊन जात असे. पीडित ही अल्प वयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी याने तिला आपण दोघे लग्न करणार आहोत असे सांगून तिच्याबरोबर वेळोवेळी शरीर संबंध प्रस्थापित केले. या शरीर संबंधातून अल्प वयीन पीडित मुलगी ही वीस आठवड्याची गर्भवती राहिली. अल्प वयीन मुलगी ही गर्भवती राहिल्याचे समजताच दोघांनी एका मंदिरात जाऊन एकमेकांना हार परिधान करून एकत्रित राहू लागले.
अल्प वयीन पीडित मुलगी ही गर्भवती असल्याने तिच्या पोटात अचानक दुखू लागले. म्हणून तिला आई वडिलांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा गर्भपात झाला.
याबाबत अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडून पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठाण्यास माहिती प्राप्त होताच वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी पीडित अल्प वयीन मुलीचा जबाब घेत गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे.