*गडब/ अवंतिका म्हात्रे*
पेण येथील सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व त्याचा मुलगा भरत पाटील यांचा सावकारकीचा जाच अनेक वर्ष पेणच्या जनतेमध्ये सुरू होता. लोकांना काही रक्कम देऊन त्याबदल्यात अवाजवी व्याज ह्या सावकारांकडून बळजबरीने वसूल केला जात होता. अखेर ह्या दोन्ही सावकारांच्या जाचाला कंटाळून पेण मधील दोन तरुणांनी दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग व सहाय्यक निबंधक पेण यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सावकारांच्या घरी, हॉटेल रायगड गोमांतक व कार्यालयात शुक्रवारी मोठं घबाड पकडले होते. त्यानुसार सहाय्यक निबंधक पेण यांनी सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (ता.२१) रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.
या घटनेची मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पेण येथील सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व त्याचा मुलगा भरत पाटील यांच्या सावकारकीच्या जाचाला कंटाळून पेण येथील दोन तरुणांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे लेखी तक्रार केल्या होत्या. त्यानुसार रायगड पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जिल्हा उप निबंधक यांना संयुक्त कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. १९) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग व सहाय्यक निबंधक पेण यांच्या संयुक्त पथकाने सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांचे पेण शहरातील चिंचपाडा येथील आमंत्रण बिल्डिंग मधील फ्लॅट नंबर ३०१, ३०२ तसेच हॉटेल रायगड गोमांतक येथे व कार्यालयात छापेमारी केली होती.
या छापेमारी मध्ये सावकारी कायद्याच्या अनुषंगाने विविध बँकांचे रक्कमेचे तसेच कोरे चेक, विविध मालमत्तांचे करारनामे, वचन चिठ्ठ्या, स्टॅम्प पेपर, साठे करार, पासबुक, मालमत्तेचे खरेदीखत, गाव नकाशा, सावकारी पावती बुक, सावकारी प्रॉमिसरी नोटबुक, कर्जाची खतावणी बुके असा दस्तऐवज या पथकाला मिळून आला होता. त्यानुसार सहाय्यक निबंधक पेण निलेश काळे यांनी सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांना सन २०२२-२३ पासून सावकारी व्यवसायासाठी पेण तालुका कार्यक्षेत्रात सावकाराचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक रायगड यांचे कडून परवाना दिलेला असून सदर दोन्ही आरोपीनी मात्र अटी व शर्तीचा भंग करून कार्यक्षेत्राच्या बाहेर सावकारी व्यवहार व व्यवसाय करताना मिळून आले. तसेच नियम बाह्य रित्या आवाजवी मोठ्या व्याजाची आकारणी करून लोकांची आर्थिक पिळवणूक करून सावकारी अधिनियम २०१४ मधील कायद्याचे उल्लंघन केले आहे.
त्यानुसार सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांचे विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि. नंबर १३४/२०२५ सावकारी अधिनियम २०१४ चे कलम २३, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४६, ४८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.