गडब/सुरेश म्हात्रे
निगडे-आमटेम खाडीत राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. आमेटम पुलाच्या दोन्ही बाजूला खाडीत कित्येक संक्शन पंप असलेल्या होड्या सर्वसामान्यांना दिसतात. मात्र, सरकारी बाबू व खाकीवाल्यांना हे दिसत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हे उत्तम प्रशासक म्हणून सर्वसामान्यांसमोर येत असताना निगडे-आमटेम खाडीत सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन बंद करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या अवैध उत्खननामागील खऱ्या सूत्रधारांना राजकीय वरदहस्त असल्याने ते कोणाला जुमानत नसून, जोरदार अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे बोलले जाते. एकीकडे
दादर-रावे परिसरात परंपरागत - उदरनिर्वाहासाठी हातपाटी व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य गावकऱ्यांना बुडी मारून नियमबाह्य जास्त वाळू काढल्यास कारवाई केली जाते. मात्र, हजारो ब्रास वाळूचे उत्खनन रोजच्या रोज होत असताना हे महसूल प्रशासनाला दिसू नये अथवा दिसूनही त्याकडे पाहू नये, असे का घडते, असा सवाल केला जात आहे. यामध्ये पोलीसच या वाळूमाफियांना मदत करीत असावेत, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. एका गाडीमागे रूपये दोन हजार मोजले जात असल्याची चर्चा होत असते. दर दिवसाला कमीत कमी १५-२० डंपर वाळू निगडे-
आमटेमच्या खाडीवरून जात आहे. या निगडे-आमटेम खाडीतील वाळू उत्खननामुळे धरमतर खाडीच्या बाह्यकाठाचे नुकसान होऊन मोठमोठाल्या खांडीदेखील
गेल्या आहेत. त्यामुळे कासू, पांडापुर, निगडे या विभागात जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर असून, पिकत्या जमिनींमध्ये मॅग्रोजची झाडे वाढू लागली आहेत. वेळोवेळी पेण तहसील कार्यालयात येथील शेतकऱ्यांनी तक्रारी करुनदेखील आजपर्यंत त्या खांडीदेखील बांधल्या गेलेल्या नाहीत. त्यातच आत्ता नव्याने होणाऱ्या उत्खननामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तरी, वेळीच या वाळूमाफियांना आवर घातला नाही, तर धरमतर खाडीचा बाह्यकाठा नष्ट होऊन भरतीचे पाणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास बळिराजा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.