गडब/सुरेश म्हात्रे
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. स्थितीचे अवलोकन केले तर महाभारताचा उल्लेख करता येईल. शिवसेनेचे दोन्ही गट कुरुक्षेत्रावर उतरले आहे. एकमेकांच्या विरोधात कोर्टात दंड थोपटले आहेत. भांडणाचा शेवट काय होईल याकडे आता राजकीय तज्ज्ञांचे लक्ष असले तरी ही लढाई जनतेच्या न्यायालयात निर्णायक ठरू शकते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार कष्टातून निघालेला घाम म्हणजे शिवसेना. मुंबईत मराठी माणसाला न्याय मिळून देण्याचे काम फत्ते झाल्यानंतर शिवसेना राज्याच्या राजकारणात उतरली. बाळासाहेब शिवसेनेचे संस्थापक असल्यामुळे या पक्षाचे प्रमुख केंद्र मातोश्री ठरले. बाळासाहेब ठाकरे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रव्यापी शिवसेना उभी केली. शिवसेनेचे पान त्यांच्याशिवाय हलत नव्हते. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे असेच समीकरण झाले. गांधी कुटुंब म्हणजे काँग्रेस असा जो भाग होता व आहे तसेच शिवसेचे होते व आहे. ठाकरे कुटुंब म्हणजे शिवसेना. त्यानंतर शिवसेनेला धक्के देण्याचे काम त्यांच्या निष्ठावंतांनीच केले.
सध्या राज्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी तेव्हा काँग्रेसचा हात जवळ केला. त्यांनतर नारायण राणे यांनी पक्षाला धक्का दिला. राज ठाकरे हेसुद्धा शिवसेनेबाहेर पडले. बाळासाहेबांनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आली. तेच मग शिवसेनेचे प्रमुख झाले. भाजपासोबत त्यांचा घरोबा होता. राज्यात सत्तेत असताना भांड्याला भांडे लागण्याचे काम मात्र सुरूच होते. नंतर राज्यात निवडणुकी झाल्यात आणि शिवसेना भाजपासून विभक्त झाली. राज्यात महाआघाडीची सत्ता आली अन् उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत. युतीची राज्यात सत्ता असताना भाजपाने शिवसेना आतून बरीच पोखरली होती. हे उद्धव ठाकरेंच्या कधी ध्यानीमनी नसताना त्यांचे खांदे समर्थक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा लचका तोडत ते पक्ष बाहेर पडले.
भाजपाने आपली संपूर्ण शक्ती एकनाथ शिंदेंसाठी खर्ची घातली. त्यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद बहाल केले. कोर्ट-कचेरीसाठी शिंदेंच्या पाठीमागे नामवंत वकिलांची फौज उभी केली. एवढेच नव्हे तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले. न्यायपालिकेसोबत विश्वासघात केला आहे. आजपर्यंत देशाच्या राजकारणात जेवढी कोंडी कुणाची झाली नसेल तेवढी उद्धव ठाकरेंची झाली आहे. त्यांना आता पक्षाचा ताबा मिळविण्यासाठी धडपडावे लागत आहे. वडिलांनी घाम गाळून जो डोलारा उभा केला होता तो उद्धव ठाकरेंच्या हातून आज कोसळला आहे. जनतेच्या न्यायालयात त्यांना न्याय मागावा लागणार आहे. नुकतीच त्यांनी एक प्रदीर्घ पत्रपरिषद घेतली.
जनतेच्या कोर्टात मी आलो असेच काहीसे ते म्हणाले. विरोधकांना खच्ची करण्याचे सरकारचे धोरण लपून राहिले नाही. फूट पाडा आणि राज्य करा असे बेईमानीचे युग भाजपाच्या काळात फळाफुलास आले आहे.