Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️शिवसेनेची जेएसडब्ल्यू कंपनीवर धडक! जेडब्ल्यू कंपनीने उभे केलेले दलालांचे कडे तोडले♦️

Responsive Ad Here
        
गडब/सुरेश म्हात्रे
                 
माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक दिली. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले. कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने उभी राहिलेली कवच कुंडले डी वाय एस पी शिवाजी फडतरे यांच्या तत्परतेमुळे मोडली असल्याचे चित्र दिसले. त्यांनी दाखविलेल्या समयसूचकत्यामुळे दोन गटातील वाद टळला.
  भूमिपुत्रांची नोकरभरती झालीच पाहिजे, पाटणसई ते डोलवीमधील ४५ गावांना फिल्टर पाणी पुरवठा झालाच पाहिजे, बार्जेस वहातुकीसाठीची खोली वाढविल्याने बार्जेसच्या लाटांनी खारबंदीस्ती बांध फुटुन पिकल्या भातशेतीत खारेपाणी शिरून शेती नष्ट झाली. त्याठिकाणी मॅग्रोज झुडुपे वाढली आहेत. तसेच डोळवी, माचेला, गडब-कारावी येथिल सुमारे २००० एकर पिकती शेतजमिन खारबंदिस्ती अभावी नष्ट झाली. शेतीवर अवलंबुन कुटुंबाचा रोजगार गेला त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, कंपनीच्या हवेतील प्रदुषणामुळे परिसरातील घरांवर काळ्या राखेचे थर बसले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कंपनीमार्फत रसायनयुक्त पाणी धरमतर खाडीत सोडल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दुर्गंधी व उधाडींचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ठोस निर्णय झाला पाहिजे. या मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जेएसडब्लू स्टील कंपनीच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, विजय कदम, बबनदादा पाटील, विष्णूभाई पाटील, किशोरभाई जैन, सुरेंद्र म्हात्रे, जगदीश ठाकूर,दिपश्री पोटफोडे, प्रदीप वर्तक, शिरीष घरत, लहू पाटील, समीर शेडगे, दिलीप पाटील, जीवन पाटील, बाळू पाटील, विजय पाटील, नंदू मोकल, अनंत, पाटील, तुकाराम म्हात्रे, हिराजी चोगले, नीलकंठ ठाकूर, शिवाजी म्हात्रे, नितीन पाटील, गजानन मोकल, समीर म्हात्रे, मयुरेश चाचड, देवदत्त पाटील, लवेंद्र मोकल, चंद्रहास म्हात्रे, मिलिंद पाटील, छाया काइनकर, चेतन मोकल, नरेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आम्ही सनदशीर मार्गाने जनआंदोलन करीत असताना कंपनी प्रशासनाने आमच्या विरोधात काही मंडळींना उभे करून हे आंदोलन मोडण्यासाठी आम्हाला अटकाव केला. परंतु त्यांचा डाव हाणून पाडला. कंपनीच्या आवारात आमच्या मोजक्या पदाधिकारी यांना आत घेतले. परंतु कंपनीच्या बाजूने उभे राहिलेले मंडळी आत कशी गेली? अशी विचारणा करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुभाष देसाई यांनी केली.
 भूमिपुत्रांना त्यांचा न्यायहक्क मिळण्याकरता हे आंदोलन असून त्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे विष्णूभाई पाटील यांनी सांगितले.
बबनदादा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत या आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांला उलटे टांगले होते त्याची पुनरावृत्ती करायला लावू नका असा सज्जड दम दिला.
 
  यावेळी डी वाय एस पी शिवाजी फडतरे यांच्यासह वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोयनाड पोलीस निरीक्षक बेलदार व बंदोबस्तासाठी 125 पोलीस कर्मचारी व 25 अधिकारी उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या आवारात परवानगी न घेता घुसलेल्या 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.