गडब/सुरेश म्हात्रे
गावातील तंटे हे गावपातळीवर मिटावे म्हणून तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव करण्यासाठी गावपातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गावपातळीवर तंटामुक्त समि ती स्थापन करून त्याद्वारे गावातील तंटे मिटविण्यासाठी फायदा होऊ लागला. तंटामुक्त गावांसाठी पुरस्कारही शासनाकडून दिले जाऊ लागले. मात्र रायगड जिल्हयात सध्या तंटामुक्ती समित्या या कागदावरच राहिल्या आहेत. त्याबाबतची सर्व कार्यवाही ठप्प आहे.
निवडणुकीनंतर, गावकी, धार्मिक कार्यक्रम या आणि इतर कारणाने दोन गटात काही वेळा भांडणे होतात. त्यामुळे गावात अशांतता पसरते. यासाठी गावातील भांडणे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकत्रित येऊन मिटविल्याने गावात शांतता लाभते. यासाठी तंटामुक्त गाव समित्या शासनाने बनविल्या होत्या.
या समितीमार्फत गावातील तंटे हे एकोप्याने मिटत होते. त्यामुळे पोलिसांचाही वेळ वाचला जात होता. तसेच कायदा सुव्यवस्था राखली जात होती.
रायगड जिल्हा पूर्वी अनेक तटे हे गावपातळीवर होत होते. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून कायद्याचा बडगा दाखवावा लागत होता. तंटामुक्त समितीमार्फत तटे मिटले जात होते. गावात शांतता निर्माण झाली होती. मात्र, पुन्हा या समित्या अक्रियाशील झाल्याने त्या कागदावरच राहिल्या आहेत. सध्या गावामध्ये समिती असली तरी त्याचे काम दिसत नाही आहे. जिल्हयातील अनेक गावांना तंटामुक्त गाव म्हणून शासनाने घोषित केले आहे. मात्र तिथेही काही प्रमाणात कुरबुरी सुरू आहेत. तसेच भांणतंटयाचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हे पक्षपाती असून ते आपल्या लोकांच्या बाजूने निर्णय देत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे .याची अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.त्यामुळे तंटामुक्ती समित्यांवरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे.
जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायती आहेत.यातील बहुतेक ग्रामपंचायती ह्या तंटामुक्त झाल्या आहेत.