Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

भाई हे काय करून बसलात

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे 

      डाव्या चळवळीतील शेकापक्षाचा खरा बाज असलेल्या परंतू अलिबाग,पनवेल-उरण मधून काळानुरूप लोप पावलेल्या; तरीही पेण मतदार संघामध्ये जपून ठेवलेल्या, जन आंदोलनांचा एकमेव चेहरा असलेला धैर्यशील पाटील भाजपवासी झाला आणि भाई तुमच्या सोबतच आम्हा कट्टर शेकाप कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का तर बसलाच पण प्रचंड रागही आला. म्हणूनच शेकाप अजून संपलेला नाही आणि धैर्यशील पाटीलाला केवळ काटशह देण्याच्या उद्देशानेच फक्त तुम्ही सेझचा प्रश्न उचललात आणि त्याकरिता आमच्या खारेपाटात मेळावा आयोजित केलात हे कळत असतानाही केवळ पक्षावरील जिवापाड प्रेमापोटी आणि निष्ठेपोटी वाशी येथील मेळाव्याला गावातील दहा -बारा मंडळी घेऊन हजर राहिलो .
          परंतू सभेठिकाणी पोहोचण्यापूर्वीच फक्त 20-25 लोकांसोबत वाजत गाजत सभे ठिकाणी येताना तुम्हाला पाहिले आणि यापूर्वी शेकडो-हजारो उत्साही कार्यकर्त्यांच्या गराड्यात वाजत गाजत येणारे आमचे जयंता भाई, मोहन भाई, धैर्यशील पाटील अशा एकत्र निघालेल्या स्वागत मिरवणूकींची आठवण झाली आणि काळजाचा ठोकाच चुकला; खूपच वाईट वाटले. सभेच्या हॉल मध्ये शिरल्यावर तर मात्र अजूनच दुःख झाले.*पिढ्यानपिढ्या* पक्षाला साथ दिलेल्या खारेपाटातील *शेकापक्षाच्या खंद्या कुटुंबियांपैकी कुठलेच चेहरे आसपास दिसत नव्हते*, जे कोणी होते ते *काँग्रेस -राष्ट्रवादी* कार्यकर्त्यांचाच नुसता *भरणा* आणि तेही जेमेतेमे दिड -दोनशे लोकांचा .भाई येणार म्हणजे हजारोंची गर्दी उसळणार या अपेक्षेने आलेल्या आम्हा कार्यकर्त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाला.
         समोरच्या प्रमुख पुढाऱ्यांच्या खुर्च्यांवर लक्ष गेल्यावर मात्र वाईट वाटणं सोडून चिड वाटायला लागली.ज्यांना मुळातच शेकाप नावाचीच एलर्जी होती किंवा आहे असे चेहरे समोरच्या खुर्च्यांवर विराजमान झाले होते. मानाच्या खुर्च्यांवर चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, व्ही बी पाटील सर असे काँग्रेसी पुढारी की ज्यांनी आयुष्यभर खारेपाटात भाईं तुमच्या याच शेका पक्षाचा आणि आम्हा कार्यकर्त्यांचा , मोहन भाईंचा,धैर्यशीलचा आणि खुद्द तुमचाही फक्त आणि फक्त दुःस्वास केला आणि जेव्हा तुमच्या,एन डी पाटील साहेब, मोहन भाई यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील पाटील जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी सेझ चा लढा लढत होता तेव्हा ती हिच काँग्रेसी मंडळी होती जी शेका पक्षाची नरकी मंडळी नेहमीच येणाऱ्या विकासाला व प्रकल्पाना विरोध करतात अशी सगळीकडे हाकाटी पिटत होती ; आणि तिच मंडळी भाई आज तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसली होती आणि सेझच्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कारण्याच्या दुतोंडी गोष्टी करत होती हे दृश्यच खरं तर खूप चिड आणणारे होते.
      या सर्व मेळाव्याचे नियोजन राजन झेमसे,बंड्या शेठ या राष्ट्रवादीच्या जोडगोळीवर होते, तेव्हाच खरंतर मनात पाल चुकचूकली होती. परंतू सभेठिकाणची गर्दी आणि माहोल बघून भाई तुम्ही आम्हाला, ज्या *राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने पक्षाची वाताहात झाली, त्याच राष्ट्रवादीच्या पर्यायाने तटकरेंच्या मांडीवर पुन्हा बसवायला निघालेत याची मनोमन खात्री पटली आणि तशी स्पष्ट कुजबुज आजूबाजूला असलेल्या आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये चालू होती.
         भाई, तुम्ही आम्हाला जेव्हा धैर्यशील पक्ष सोडणार अशी कुणकुण लागल्यावर अलिबागला बोलवून घेतले होतात तेव्हा आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला त्या रविशेठ पाटीलासोबत जाणार काय असा प्रश्न विचारलात आणि तो आम्हालाही पटला म्हणूनच भाई मोहन पाटील हृदयात असूनही आम्ही त्याच्या पोरासोबत न जाता आपल्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.परंतू भाई तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून त्याच रवीशेठ पाटिलांचा रावेकर पुतण्या चंद्रकांत पाटील चिकटूनच बसला होता हे पाहून डोक्याची तिडीक उठली.गडब -डोलवी MIDC आंदोलनातील अलिबागची सभा आटोपल्यावर तुम्ही त्याच रवीशेठ पाटीलांच्या गाडीत बसून त्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन गेला होतात हे आम्ही सोईस्कररित्या विसरलो होतो पण रविशेठ पाटीलाचा बागुलबुवा आमच्यासाठी उभा करून तुम्ही मात्र त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी मैत्री जपायची असं कसं चालणार भाई.
      भाई तुम्ही जे मुद्दे मांडताय त्या मुद्द्यावर आम्हीही आपल्या माणसांना धैर्यशील पाटिलाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतोय, तरीही *80%* पेक्षा जास्त आपली लोकं धैर्यशीलच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निघूनही गेलीत.परंतू कालची ही सर्व परिस्थिती भाई आपल्या सोबतच आपल्या मंडळींना नकोशी असलेली कोणती तरी अदृश्य शक्ती आपल्याशी संगनमत करून काम करतेय असा दाट संशय आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करणारी होती आणि ते जर खरे असेल तर मोहन भाईंवर जीव असूनही आणि धैर्यशील बाबत सहानुभूती असूनही आपल्यावर आणि शेकापक्षावर निष्ठा ठेवून थांबलेल्या आम्हा 15-20% कार्यकर्त्यांनाही नक्कीच विचार करण्याची वेळ येईल.गेले चार वर्ष तुम्ही जाहीर पणे सांगत होतात की तटकरे सोबत जाणे ही चूक होती त्याच तटकरेंशी पुन्ह्याने प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष राजकीय सामंजस्य चालू आहे असे लक्षात आले तर मात्र केवळ पेण तालुक्यातीलच उरले सुरलेला कार्यकर्ताच नाही तर अगदी अलिबागचा एकदम घरातला कार्यकर्ताही भाई तुम्हाला शेवटचा लाल सलाम* ठोकेल एवढं मात्र नक्कीच.
           धैर्यशीलला काटशह देण्याच्या नादात भाई तुम्ही तुमची भविष्यातील राजकीय दिशाच(जी की शेकापक्षाच्या कार्यकर्त्याला चिड आणणारी आहे हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्ही सध्यातरी लपवू पाहताय ),कालच्या खारेपाटातील मेळाव्याने अप्रत्यक्षरित्या उघड केलीत, म्हणूनच म्हणावंसं वाटतंय भाई तुम्ही हे काय करून बसलात!