गडब/सुरेश म्हात्रे
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (१९ जानेवारी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील दहाजण ठार झाले. हे सर्व प्रवासी मुंबईहून आपल्या आजीच्या उत्तरकार्यासाठी गुहागर तालुक्यातील हेदवी येथे निघालेले असतानाच त्यांच्यावरती काळाने घाला घातला. या अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा पसरला होता. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथून अधिक उपचाराकरिता मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच पाली गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका बालकाचा, ४ महिलांचा व ५ पुरुषांचा समावेश आहे.
गुहागर तालुक्यात असलेल्या हेदवी गावात आजीचे उत्तर कार्य असल्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या जाधव कुटुंबातील सदस्य बुधवारी मुंबईत एकत्र येऊन रात्री १० वाजणेच्या सुमारास (एमएम ४८ बीटी ८६७३ ) या क्रमांकाच्या इकोकारने गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कार रेपोली गावाजवळ आली असता त्याच वेळेस मुंबई बाजूकडे विरूद्ध बाजूने (एमएच ४३ जी ७११९) या क्रमांकाचा ट्रकसमोर आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर ठोकर झाली आणि एकाचकुटुंबातील १० जणांना प्राण गमवावे लागले. अपघाताचे वृत्त समजताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकृष्ण नावले यांच्यासह प्रदिप घोडके सुग्रीव मुंडे नितिन रसाळे श्रीराम मोरे सुनिल गोळे सायली सानप यशवंत चव्हाण श्रीकृष्ण पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काकतकर आदींसह टेमपाले येथील मजीद लोखंडे, पोलीस पाटील यांच्यासह, समीर मुरूडकर लोणेरे सिध्देश टेंबे या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले .
या अपघाताची माहिती मिळाल्यावर
माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्यासह अनेक माणगावकरांनी सकाळी लवकर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. या अपघात प्रकरणी गोरेगाव पोलीसांनी ट्रक चालक अमृत शंकर खेतरी याला अटक केली असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्या ट्रकची फिटनेस मुदतही संपुष्टात आलेली आहे. *अधिकाऱ्यांकडून पहाणी..*
अपघातानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघात स्थळी भेट देऊन दोन्ही वाहनांची तसेच महामार्गावरील धोकादायक वळणांची पहाणी करत पोलीस अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल तसेच यापुढे अपघात टाळण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याकरिता पुढाकार घेतला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांजवळ बोलताना दिली.
*अपघातातील मृतांची नावे*
कारमधील अमोल रामचंद्र जाधव (वय- ४०) चालक निलेश चंद्रकांत पंडित (वय ४५), दिनेश रघुनाथ जाधव (वय ३०) सर्व हेदवी - ता. गुहागर, निशांत शशिकांत जाधव (वय- २३) रा. विरार, स्नेहा संतोष सावंत (वय ४५) रा. कलमविष्ट ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग सध्या रा. जोगेश्वरी मुंबई, कांचन काशिनाथ शिर्के (वय ५८) रा.चिपळूण जि.रत्नागिरी सध्या रा. नवी मुंबई, दीपक यशवंत लाड (वय ६०) रा. कॉटन ग्रीन मुंबई, मुद्रा निलेश पंडित (वय - १२) रा. हेदवीहेदवी
ता. गुहागर जि. रत्नागिरी सध्या रा. मुंबई, नंदिनी निलेश पंडित (वय ४०) रा. हेदवी ता. गुहागर जि. रत्नागिरी सध्या रा. मुंबई या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर भव्य निलेश पंडित (वय ४) रा. हेदवी ता.गुहागर जि.रत्नागिरी सध्या रा.मुंबई या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर अधिक उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच पाली गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. असे एकूण १० जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
*त्या कोवळ्या जीवाचा संघर्ष अर्ध्यावाटेत संपला.....*
*या अपघातानंतर मदत कार्यासाठी पोहचलेल्या पोलिसांसह मदतकर्त्यांना इको गाडीत अडकलेल्या अवस्थेत मात्र हलक्या आवाजात रडणारा चार वर्षांचा भव्य दिसला. चक्काचूर झालेल्या | कारमधून त्याला बाहेर काढण्याचे आव्हान समोर असताना चारही बाजूने शर्थीचे प्रयत्न करत भव्य याला अपघातग्रस्त कारमधून | बाहेर काढण्यात आले. तातडीने त्याला उपचारासाठी माणगावच्या | उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारा नंतर त्याला मुंबईतील रूग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याने लगेचच | पुढील प्रवास सुरू झाला या प्रवासात तो इवलासा जीव मरणासोबत संघर्ष करत होता. मात्र रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात गेली आणि एक दिर्घ श्वास घेऊन 'भव्य' चा संघर्ष इथेच संपला.