Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️ श्री जगदंबा देवीची मूळ मूर्ती बदलण्याच्या निर्णयाला विरोध♦️भाविक व ग्रामस्थांची मागणी; मूर्ती बदलण्याऐवजी वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करण्याचा आग्रह

Responsive Ad Here


   .✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

पेण तालुक्यातील ऐतिहासिक वाशी गावाचे तसेच संपूर्ण वाशी खारपाट पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवती जगदंबा देवी मंदिर परिसरात असलेली प्राचीन मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाला भाविक व ग्रामस्थांकडून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. 
    मंदिरातील अतिशय प्राचीन, जागृत आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली श्री जगदंबा देवीची मूर्ती बदलण्याचा निर्णय काही प्रमुख व्यक्तींकडून मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे देवस्थान मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम, १९५० अंतर्गत धर्मादाय आयुक्त, रायगड-अलिबाग कार्यालयाकडे नोंदणीकृत ‘सार्वजनिक न्यास’ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
इतिहासाचा अमूल्य वारसा जपण्याऐवजी मूळ मूर्ती बदलणे हे कायदेशीर, धार्मिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे अभ्यासक व सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. शतकानुशतके भाविक ज्या मूर्तीची श्रद्धेने पूजा-अर्चा करीत आले आहेत, त्या मूर्तीला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.
    मूर्ती बदलण्याऐवजी संवर्धनाची मागणी
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात प्राचीन मूर्तीला नैसर्गिक अथवा भौतिक नुकसान झाले असल्यास ती थेट बदलण्याची गरज नाही. ‘केमिकल कन्झर्वेशन’ अर्थात वैज्ञानिक संवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूळ मूर्तीचे जतन करून ती पुढील अनेक शतके सुरक्षित ठेवणे शक्य आहे, असा मुद्दा भाविकांकडून मांडण्यात आला आहे. 
भारतीय पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ आणि मूर्तिशास्त्राचे जाणकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन मूर्तीचे संवर्धन करता येऊ शकते. त्यामुळे मूर्ती बदलण्याऐवजी तिच्या शास्त्रोक्त संवर्धनावर भर देण्याची मागणी जोर धरत आहे.
धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीची मागणी
सार्वजनिक न्यासातील धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्तीमध्ये मोठा बदल करण्यासाठी संबंधित कायदेशीर प्रक्रिया व आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक हिताचा विचार करून कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
श्री जगदंबा देवीची प्राचीन मूळ मूर्ती ही पेणसह वाशी विभागाच्या परिसराची ओळख, अस्मिता आणि पूर्वजांचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे ‘हाकेचा धावणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या’ देवीच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारे बदलण्याऐवजी तिचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्यात यावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

“ जगदंबा देवीची मूर्ती बदलली जाऊ नये,” अशी मनोमन वाटणाऱ्या हजारो जांबदा देवी भक्तांची भावना असून, मूळ मूर्तीचे संरक्षण करून धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपावा, असे आवाहन करण्यात आले आहे.