Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️मुरूडच्या मातीतला भारतीय सिनेसृष्टीतील भारदस्त आवाज वास्तववादी नटसम्राट काळाच्या पडद्याआड....

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
       
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरूड या समुद्र किनारी असलेल्या निसर्गरम्य अशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता... त्यांच्या वडीलांना नाटक आणि तमाशाची विशेष आवड होती, आणि याच आवडीतून नानांना सुद्धा अभिनयाची गोडी लागली. कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपले गाव सोडून मुंबई मायानगरी गाठावी लागली. नानांना चित्रकलेची विशेष आवड होती. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतले. सुरुवातीला चित्रपटांचे पोस्टर रंगविणे आणि मुंबईच्या विविध भागात ते लावण्याचे काम देखील नानांनी केले आहे. पुढे जाऊन आपल्याच चित्रपटांचे पोस्टर सर्वत्र लागतील असे स्वप्नात देखील नानांना कधी वाटले नसेल. पण हेच नाना आपल्या नैसर्गिक आणि वास्तववादी अभिनयाने, भारदस्त आवाज आणि विशिष्ट संवाद फेकीने भारतीय सिनेसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट झाले.
     नाना पाटेकर यांच्यावर त्यांची जन्मदात्री आईप्रमाणेच सुलभा देशपांडे आणि विजयाबाई मेहता यांनी मातृवत प्रेम केले. विजयाबाईंच्या तालमीत आणि सुलभा ताईंच्या रंगमंचीय सहवासात नानांचा अभिनय बहरत गेला. 
  ...नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली. चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी अनेक वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी आपल्या अभिनयाला अनेक पैलू पाडून आपली स्वतःची अशी आक्रमक आणि वास्तववादी वेगळी शैली निर्माण केली.
  .  जेष्ठ नाटककार जयवंत दळवी लिखित "पुरुष" या नाटकातील "गुलाबराव" ही अत्यंत क्रूर, धूर्त, अहंकारी आणि शोषक राजकारण्याची भूमिका इतक्या जिवंतपणे साकारली की नाना आणि गुलाबराव हे एक समीकरणच तयार झाले. गुलाबरावाच्या भूमिकेतील नानांच्या संवादफेकीचा अंदाज आणि जरब इतकी भयानक होती की मराठी रंगभूमीवरील सर्वात खतरनाक खलनायकी भूमिकांमध्ये तिची गणना होते. ही भूमिका म्हणजे नानांच्या एकूण अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरावी अशी महत्वाची आणि एकूणच अभिनय कारकिर्दीला एक वेगळी उंची देणारी ठरली. या नाटकाचे त्याकाळात १९०० हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. *पुरुष* बरोबरच नानांनी *हमीदाबाईची कोठी, महासागर, कथा* यांसारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या,  मात्र वी. वा. शिरवाडकर यांच्या "नटसम्राट" या नाटकात काम करण्यास त्यांनी नकार दिला होता. 
     नानांनी नाट्यसृष्टी बरोबरच मराठी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविला आहे. त्यांनी *भालू, सिंहासन, नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, आपला माणूस, डॉ प्रकाश बाबा आमटे* अशा विविध चित्रपटांत अजरामर भूमिका साकारल्या आहेत. 

    नानांनी १९७८ मधे हिंदी चित्रपट सृष्टीत *"गमन"* या चित्रपटाद्वारे प्रवेश केला. सुरुवातीला अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारत असताना १९८६ साली एन. चंद्रा यांच्या *अंकुश* या चित्रपटातील *रवी* ची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेने नानांना हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली. नानांचा वास्तववादी अभिनय आणि भारदस्त आवाजातील उत्कृष्ट संवादफेक यामुळे नानांनी अनेक हिंदी चित्रपट अजरामर केले. *प्रहार* हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन नानांनी केले होते. हा चित्रपट वास्तववादी वाटावा म्हणून नानांनी बेळगाव येथील *मराठा लाइट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर* मध्ये जाऊन सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले होते. याच चित्रपटात माधुरीने मेकअप शिवाय अभिनय करावा असा आग्रह नानांनी धरला होता. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना रायफल शूटिंग ची आवड निर्माण झाली. पुढे नानांनी रायफल शूटिंग मधे राष्ट्रीय स्तरावर अनेक पदक मिळविले.
      हिंदी चित्रपट सृष्टीत नानांनी *परिंदा* या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली त्यांना या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. हिंदी सिनेसृष्टीतील आवाजाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे राजकुमार यांच्या सोबत त्यांनी *तिरंगा* या चित्रपटात इन्स्पेक्टर वागळे ची भूमिका साकारली. नानांचा *क्रांतिवीर* हा चित्रपट म्हणजे त्यांचा अभिनय आणि संवादफेक यांचा उत्कृष्ट आविष्कार असलेला चित्रपट. *वजूद* या चित्रपटातील त्यांची भूमिका ही नानांच्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेशी भूमिका होती. *यशवंत* या चित्रपटातील नानाचा पोलीस इन्स्पेक्टर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

    नाना एक उत्कृष्ट अभिनेते होतेच पण त्याहूनही मोठे सहृदयी व्यक्तिमत्व होते. मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने त्यांनी *"नाम"* फाउंडेशन ची स्थापना करून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य करत असतानाच दुष्काळ ग्रस्त भागात जलसंधारण संदर्भात महत्वाची कामे हातात घेतली, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असतानाच त्यांना आधार देण्याचे महत्वाचे काम केले आहे. नानांचा जीवनाकडे पाहण्याचा स्वतःचा असा एक वेगळा दृष्टिकोन होता. त्यांंनी आपल्या ७५ वर्षांच्या आयुष्यात जीवनाचे अनेक चढउतार अनुभवले, यशाच्या उंच शिखरावर असताना देखील त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. चित्रपट सृष्टीच्या झगमगत्या दुनियेत राहून सुद्धा नानांनी सामान्य माणसांशी जोडलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. आज नानांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीतील मराठीचा भारदस्त आवाज हरपला... नानांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... भावपूर्ण श्रद्धांजली