गडब / अवंतिका म्हात्रे
..पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव-गडब येथे सुमारे २८ लाख रुपयांच्या GST रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम शासनाच्या संबंधित खात्यात जमा न करता अन्यत्र वर्ग करण्यात आल्याचा दावा पेण पंचायत समितीच्या सदस्या प्रीती प्रशांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आरोपांना ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीतील ठराव आणि प्रोसीडिंगच्या कागदपत्रांचा आधार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रांनुसार, ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे धीरज गौरी शुक्ला यांची चार्टर्ड अकाउंटंट म्हणून निवड करण्यात आली होती. सरपंच व सदस्यांच्या आदेशानुसार संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात अदा करण्यात आल्याचा आरोप आहे.
प्रीती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर, ३० ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण सुमारे २८ लाख रुपये वर्ग करण्यात आले. मात्र, ही GST रक्कम शासनाच्या संबंधित खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
....GST रक्कम वेळेत शासनाकडे जमा न झाल्यास ग्रामपंचायतीवर व्याजाचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रकमेचा नेमका वापर कुठे आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याची चौकशी करून संपूर्ण आर्थिक व्यवहार स्पष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील ठराव, प्रोसीडिंग आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासून संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाच्या चौकशी अहवालाकडे काराव-गडब ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.