- ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सामाजिक कार्यकर्ते अमरचंद बळीराम म्हात्रे यांच्या उपोषणा नंतर या प्रश्नावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. वढाव येथील उंच जलकुंभ परिसरात शेवटच्या टोका वरील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी यापूर्वीही त्यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बुस्टर पंपाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा न झाल्याने श्री. म्हात्रे यांनी १५ जून २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण येथे बेमुदत उपोषण सुरू केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने चर्चा घडवून आणत पुढील बैठकीचे लेखी आश्वासन दिल्या नंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
प्रशासनाच्या पत्रानुसार १६ जून २०२६ रोजी प्रांत कार्यालय, पेण येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत वाशी नाका ते वाशी तसेच वाशी नाका ते शिर्की या जलवाहिन्या सदोष असल्यामुळे पूर्ण दाबाने पाणी सोडल्यास त्या वारंवार फुटत असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी मांडला. या जलवाहिन्यांची गुणवत्ता नियंत्रण विभागा मार्फत स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली. तसेच हेटवणे ते शहापाडा आणि तरणखोप ते वाशीनाका या मार्गा वरील अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचीही दखल घेण्यात आली.
बैठकीत गोळीबार मैदान परिसरातील दाबक्षय, मध्यवर्ती जलसाठा (MBR) वगळून गुरुत्वाकर्षण पद्धतीने थेट शहापाडा धरणात पाणी सोडण्याची व शहापाडा धरणातून (MBR) मधून पेण खारेपाटाला पाणीपुरवठा करण्याच्या मागणी सोबतच' शाश्वत जलव्यवस्थापनाच्या विविध उपायांवर चर्चा झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वेळबद्ध कार्यक्रमा नुसार आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, खारेपाट विकास संकल्प संघटनेचे कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणामुळे प्रशासनाला प्रश्नाची तीव्रता लक्षात आली असली तरी आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, याकडे संपूर्ण खारेपाट परिसराचे लक्ष लागले आहे.
.