कमी किमतीत खरे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये केसाराम सावजी बागरी वय ४७ मुळ रा. राणीवाडा, ता. राणीवाडा, जि. जालोर राज्य-राजस्थान, सध्या रा. किल्ला, ता. रोहा, जि. रायगड), मोहनलाल गंगाराम परमार( वय-४२ वर्षे, बाबुरा लगामरा, जि. जालोर राज्य-राजस्थान, सध्या रा. किल्ला, ता. रोहा, जि. रायगड),राजु शिलाराम राठोड वय-२७ वर्षे, सध्या रा. छेलाराम बागरीयो का वास, ता. भीमनाल, जि. जालोर, राज्य-राजस्थान),अनिल हरिराम परमार( वय-२६ वर्षे, मुळ रा. बागरीयो का बेरा, डकात्रा जि. जालोर, राज्य-राजस्थान), जितेंद्रकुमार मोहनलाल परमार (वय-२७ वर्षे, मुळ रा. बागरा रोड, डकात्रा जि. जालोर, राज्य-राजस्थान)यांचा समावेश आहे.
१५ मे रोजी आरोपींनी फिर्यादीला कमी दरात खरे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात बनावट दागिने देऊन आरोपी पसार झाले होते.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून काही जणांनी व्यवहार केला तर इतरांनी पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी किल्ला, ता. रोहा येथून आरोपींना ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना स्वस्त सोन्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे, अधिकृत ज्वेलर्सकडूनच खरेदी करण्याचे आणि फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.