गडब/अवंतिका म्हात्रे
पेण शहरातील एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या चायनीज सेंटरजवळ आज सोमवार दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास उभी असलेल्या Maruti Suzuki WagonR कारवर अचानक झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र चालक बाहेर असल्याने आणि गाडीत कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
पेण शहरातील एचपी पेट्रोल पंपाजवळील परिसरात अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. एमएच-०६ / सीडी-५१७३ क्रमांकाची कार झाडाखाली आसऱ्यासाठी उभी करण्यात आली होती. याचवेळी अचानक मोठे झाड कोसळल्याने कारचा पुढील व वरचा भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्याचे सेवेसी तत्पर पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नगरपालिका प्रशासन तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून मदतकार्य सुरू केले. काही वेळातच कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले.
झाड रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.