Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

अपंगांना न्याय कधी मिळणार; अपंगांची खंत!

Responsive Ad Here

गडब /सुरेश म्हात्रे
     अपंगत्व दाखला काढण्यासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे अपंग बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र या अत्यंत संवेदनशील अशा या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली बसण्याची, प्राथमिक सोयींची व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याचे विदारक चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळाले. परिणामी अनेक अपंग नागरिकांना तासनतास उभे राहावे लागले.
   एक-दोन अधिकारी व कर्मचारी अपंगांशी संवेदनशीलतेने वागतात, हे मान्य असले तरी अनेक अधिकारी व कर्मचारी उद्धट, असंवेदनशील व दुर्लक्ष करणारे वर्तन करत असल्याची तीव्र भावना अपंग बांधवांमध्ये आहे. सकाळी लवकर दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांना सायंकाळ पर्यंत थांबावे लागले. दूरवरून आलेल्या अपंग बांधवांचे यामुळे शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.
   काल तपासणीसाठी आवश्यक असलेले एक-दोन डॉक्टर अनुपस्थित असल्याने, अपंगांची कोणतीही चूक नसताना त्यांना पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागणार आहेत. तपासणी पूर्ण झालेल्या एकाही अपंग नागरिकाला कालच्या दिवशी दाखला देण्यात आलेला नाही. सर्वांना पुढील २७ डिसेंबर ही तारीख देऊन परत पाठवण्यात आले. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
   याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, मुंडे प्रकरणाचा हवाला देत अनेक अपंग नागरिकांना जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे आधी पासूनच अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलने दिलेले जुने अपंगत्व दाखले आहेत, त्यांनाही पुन्हा बाहेरील रुग्णालयात रेफर केले जात आहे.
   अपंग बांधवांच्या आपापसातील चर्चेतून आणखी धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पूर्वी ५०% किंवा ४०% अपंगत्वाचा दाखला असलेल्या नागरिकांना आता २५% अपंगत्वाचे दाखले दिले जात असल्याचे आढळून येत आहे. १०-१५ वर्षांनी वय वाढल्या नंतर अपंगत्व कमी कसे होते, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अपंगत्व कमी होणे म्हणजे उपचारातून बरे होणे नव्हे' उलट वास्तवात वय वाढल्याने अपंगत्वाचे परिणाम अधिक तीव्र होतात, हे वैद्यकीय सत्य आहे.
   या सर्व घटनांमुळे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल मधील अपंगत्व दाखला प्रक्रियेत अपारदर्शकता, असंवेदनशीलता व मनमानी सुरू असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे. काल दिसलेले दृश्य म्हणजे अपंग नागरिकांचा अक्षरशः छळ असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
   अपंग बांधवांसाठी उभारलेली यंत्रणाच जर त्यांच्या त्रासाचे कारण ठरत असेल, तर ती यंत्रणा अपयशी ठरते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत तातडीने मूलभूत सुधारणा, पुरेसे डॉक्टर, योग्य बसण्याची व्यवस्था, वेळेत दाखले देण्याची स्पष्ट कार्यपद्धती आणि अपंगांशी मानवीय वागणूक देण्या बाबत ठोस आदेश होणे अत्यंत आवश्यक आहे.
   या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी केवळ आपल्या कार्यकर्त्यांना नियमबाह्य मदत करण्या पुरते मर्यादित न राहता, समाजातील सर्वांत दुर्बल घटक असलेल्या अपंग बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी ठामपणे उभे राहणे आज अत्यावश्यक झाले आहे. अपंगत्व ही कोणाची चूक नसून, ते एक सामाजिक वास्तव आहे, आणि त्यावर आधारलेली यंत्रणा माणुसकीने आणि सद्भावनेने चालली पाहिजे.
   एकीकडे शासन व लोकप्रतिनिधी अपंगांना “दिव्यांग” असे गोंडस नाव देतात, मोठ्या घोषणा करतात व योजना जाहीर करतात; पण दुसरीकडे मुंडे प्रकरणाचा सरसकट हवाला देत सर्व अपंग बांधवांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. कोणतीही वैयक्तिक तपासणी किंवा वस्तुनिष्ठ वैद्यकीय निकष न लावता अपंगत्वाची टक्केवारी कमी केली जाते, जेणे करून अपंगांना चांगल्या योजनांचा लाभ मिळूच नये' हा वास्तव प्रकार केवळ अन्यायकारकच नव्हे, तर अपंग बांधवांचा जाणून-बुजून केलेला मानसिक छळ आहे.
   अपंगत्व कमी दाखवणे म्हणजे त्या व्यक्तीच्या वेदना, अडचणी आणि वास्तव नाकारणे होय. दिव्यांगत्व ही दया मागण्याची बाब नाही, तर हक्काची ओळख आहे. त्या हक्कांवर संशय, अपमान आणि अडथळे उभे करणे म्हणजे संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचाच भाग आहे.
   अपंगत्वाचा अनुभव कोणालाही कधी, कुठे, कसा येईल सांगता येत नाही. म्हणूनच अपंग बांधवांशी वागताना केवळ नियम नव्हे, तर समवेदना, सद्भावना, न्याय आणि मानवी दृष्टिकोन हेच निकष असले पाहिजेत. अन्यथा “दिव्यांग” हा शब्द केवळ कागदा वरच उरेल, आणि प्रत्यक्षात अपंगत्वाचा अपमान कायमच होत राहील' हीच आजची विदारक वस्तुस्थिती आहे. 
   कोणाच्याही घरात अपंगत्वाचा अनुभव यावा असे कधीच अपंग बांधवांच्या मनात नसते. उलट, प्रत्येक घर सुखी, सक्षम आणि स्वावलंबी राहावे हीच त्यांची आज पर्यन्त सद्भावना राहिली आहे. मात्र जेव्हा अपंग व्यक्तींना सातत्याने अमानवी वागणूक दिली जाते,
त्यांच्या वेदना, अडचणी आणि हक्कांची खिल्ली उडवली जाते, तेव्हा त्या अन्याया विरुद्ध अपंग बांधवांच्या मनात संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे.
अशा वेळी अपंगत्वाचा अपमान करणाऱ्यांना त्याची जाणीव स्वतःच्या अनुभवातूनच व्हावी, त्यांच्या घरात अपंगत्वाने जन्म घ्यावा असे अन्याय ग्रस्त अपंग बांधवांना वाटले, तर त्यात द्वेष नाही, तर व्यवस्थेच्या संवेदनाहीनते विरुद्धचा आक्रोश आहे.



.