गडब/सुरेश म्हात्रे
पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांनी 10 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या भव्यदिव्य क्रिकेट सामन्यांत झालेल्या उद्घाटनीय सामन्यात पेण पत्रकारांनी उत्कृष्ठ खेळ करीत पेण तालुक्यातील डॉक्टरांना पराजित केले. सदर सामन्यांचे उद्घाटन डीवायएसपी शिवाजी फडतरे, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे, श्रीमती साधना कांबळे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, माजी सरपंच मंगेश पाटील, विनायक पाटील, राज कडू, स्वप्नील पाटील, प्रवीण पाटील, रोहन पाटील, ओमकार डाकी आदी मान्यवर उपस्थित होते.
DK चषक 2024 च्या उद्घाटन प्रसंगी नेहमीच जनतेची परमेश्वरासमान सेवा करणारे पेणचे डॉक्टर आणि लेखणीतून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पेण पत्रकार यांच्यामध्ये चार षटकांची मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत डॉक्टरांनी नाणेफेक जिंकत पत्रकारांना फलंदाजी साठी आमंत्रित केले. कर्णधार देवा पेरवी हे नेतृत्व करणाऱ्या पेण पत्रकारांनी उत्कृष्ठ खेळ करीत 4 षटकांत 53 धावा काढल्या व डॉक्टरांना 54 धावा काढण्याचे आव्हान दिले. मात्र नेहमीच स्वतः शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या पेणच्या डॉक्टरांची धावा काढताना दमछाक झाली, त्यांना चार षटकांत सहा बाद 48 धावांपर्यँतच मजल मारता आली. 42 धावा काढणाऱ्या नित्यानंद पाटील यांस सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यावेळी डॉ.रोशन पाटील, डॉ.सचिन नाईक, डॉ.अभिजित पाटील, डॉ.आशीर्वाद मोकल, डॉ.प्रीतम पाटील, डॉ.अमोल पाटील, पत्रकार देवा पेरवी, विनायक पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, प्रदीप मोकल, सुदर्शन शेळके, मितेश जाधव, रुपेश गोडीवले, आकाश मोकल, निलेश पाटील, नित्यानंद पाटील आदींनी उत्कृष्ठ खेळ करीत सामन्यात रंगत आणली. सदर भव्यदिव्य क्रिकेट सामने पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 10 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत खेळविण्यात येणार आहेत.