गडब / अवंतिका म्हात्रे
वर्षभरात श्रावण महिन्याची विशेष अशी ओळख आहे. या महिन्यात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा झाली की तरुणांना वेध लागतात ते ढाकुमाकुमचे अर्थात कृष्णजन्म झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमीचे. गोपाळकाला हा गावोगावी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याची तयारी म्हणून पेण मध्ये गोपाळकालासाठी रंगीबेरंगी मडकी बाजारात विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भगवान श्रीकृष्णाचे जन्मोत्सव, गोपाळकाला गोविंदा निमित्ताने दहीहंडी बांधल्या जातात. या बांधलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी उंच उंच मनोरे उभारून बालगोपाल मोठ्या उत्साहाने आगेकुच करताना दिसतात. याच दहीहंड्यासाठी लागणारी रंगीबेरंगी मडकी बाजारात जागोजागी विक्रीला आहेत. या रंगीबिरंगी मडक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ते खरेदीसाठीही ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसते.
पेण बाजारपेठेमध्ये नगरपालिका, पोटे मार्ग चावडी नाका, मिर्ची गल्ली आदी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाजबांधव सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मडकी बनविण्यासाठी लागणारी माती, वेळ, रंग आणि वाढती महागाई लक्षात घेता लहान आकाराची मडकी ८० ते १५० रुपये पर्यंत तर मोठ्या आकाराची मडकी ही १५० ते २५० रुपयापर्यंत मिळत आहेत. त्यातच लागणारे नायलॉन दोरी बरोबर वापरात येणारे वेगवेगळे टी-शर्ट, रंगीबेरंगी दुपट्टे सुद्धा वाढत्या दरात मिळत आहेत. पण दर वाढते असले तरी गोपाळ बांधव ते जल्लोषात खरेदी करताना दिसतात .


