![]() |
* गडब / सुरेश म्हात्रे*
पेण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून घरांमध्ये दुकानांमध्ये तसेच सकल भागांमध्ये पाणीचपाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हमरापुर, जोहे, कळवे विभागातील अनेक गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गणपती कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मागील दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील पेण एसटी स्टँन्ड, पेण नाका, विक्रम स्टँन्ड, बाजारपेठ, शंकर नगर, हुडको मैदान आदि ठिकाणी पाणी साचले होते. भोगावती नदी धुतडी भरुन वाहत आहे. भुंडापुलावरुन पाणी वाहत होते. तालुक्यातील दादर, उर्णोली, सोनखार, कळवे, जोहे, तांबडशेत, रावे, खरोशी, बळवली या गावांना जाणाऱ्या रस्त्यावर पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या गावांचा संपर्क तुटला. अंतोरे, दुरशेत, खरोशी व तांबटशेत गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. नदीकिनारी सखल भागात असलेल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.
काल दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील अनेक मार्गावर पावसाचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे .यामध्ये गडब गावामध्ये जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झाली होती . यावेळी सामाजीक परिस्थिती वर लक्ष ठेवून असणारे कार्यकर्ते यांनी पुराची पाहणी केली व सुरक्षेच्या हष्टीने मार्ग दुसरीकडे वळवला .

