गडब/अवंतिका म्हात्रे
अलिबाग, २७ मार्च (वार्ताहर)- अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी कांदळवनयुक्त जमिन जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे करण्याचे अलिबाग तहसील कार्यालयाचे आदेश अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे ही जमिन सरकारकडे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी स.नं. ५०/ड या सरकारी कांदळवनयुक्त जमिन जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे करण्याचे आदेश ३ जून २०२२ रोजी तात्कालीन अलिबाग तहसील कार्यालयातून दिले होते. ही जमिन पुन्हा शासनाच्या ताब्यात देण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. सुमारे दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय झाला आहे.
जिल्हा न्यायालयामध्ये अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी स.नं. ५०/ड या सरकारी कांदळवनयुक्त जमिनीवरील जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीच्या अतिक्रमण व कांदळवन तोडीचा खटला न्यायालयात प्रलंबित असताना तहसिलदार अलिबाग यांच्या कार्यालयाने ३ जून २०२१ च्या आदेशाने जेएसडब्ल्यू कपनीच्या अर्जावरून सरकारी राखीव कांदळवन जमिन वनविभाग व जिल्हाधिकारी रायगड यांना अंधारात ठेवून ही सरकारी कांदळवन जमिन जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे केली होती. तसा सातबाराही कंपनीच्या नावे करण्यात आला होता.
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी अलिबागचे उप वन संरक्षक यांची भेट घेवून कांदळवनाची जमिनीचे रक्षण करण्यासाठी वन विभागाने त्वरील अपिल दाखल करावे, असे लेखी पत्र दिले होते. अशाच प्रकारचे पत्र शहाबाज येथील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष व्दारकानाथ पाटील यांनीही अलिबागचे प्रांत यांना ग्रामस्थांमार्फत देवून कांदळवनाच्या जमिनीचे रक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वन विभागामार्फत या प्रकरणामध्ये अपिल दाखल करण्यात आले.
"अलिबागचे प्रांत प्रशांत ढगे यांनी याची दखल घेतली. त्यांनी आपल्या अधिकारानुसर अलिबाग तहसील कर्यालाने काढलेला ३ जून २०२१ चा आदेश रद्द केला.. त्यामुळे कांदळवनाची जमिन पुन्हा सरकारकडे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..
कांदळवन जमिनीबाबत कोणताही निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय घेता येणार नाही, असे शासनाचे निर्देश असतानाही सरकारी कांदळवन जमिन जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे करण्याच्या महसूल खात्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.