Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपात ;जि.प.सदस्य, पं.स. सदस्य,नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी भाजप मध्ये दाखल

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे 

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे भाजप मध्ये स्वागत...
 शेतकरी कामगार पक्षाचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. धैर्यशील पाटील यांनी भाजपचं कमळ हातात घेऊन शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या सोबत जिप माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, जिप सदस्य डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, संजय म्हात्रे, नगरसेवक शोमेर पेणकर, सुनीता जोशी, दिनेश पाटील, विवेक जोशी, मंगेश दळवी, सुरेश पाटील, नीलकंठ म्हात्रे, नीलकंठ दिवेकर, आरिफ मणियार, संजय डंगर आदी प्रमुख नेत्यांसह जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, सदस्य, बाजार समिती सभापती, विभाग प्रमुख, गाव प्रमुख आदी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील पाटील यांचं कौतुक करताना सांगितले की, धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसंच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते. जनतेत राहून जनतेची कामं करणं यासंदर्भातलं त्यांचं सातत्य महत्त्वाचं आहे. धैर्यशील पाटील भाजपात असले पाहिजेत असं आम्हाला 2014 च्या निवडणुकीवेळी वाटत होते, मात्र त्यावेळी ते प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र आज त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला आनंद होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, धैर्यशील पाटील आपले प्रश्न धडाडीने मांडत असतात. धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं. तळगाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे. आज देशाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत... त्यांचं नेतृत्त्वही असाच विचार करणारं आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आमदार रवींद्र पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गीता पालरेचा, दिलीप भोईर, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, अनिरुद्ध पाटील, राजेश मपारा, ललित पाटील, श्रीकांत पाटील, शशिकांत भगत, विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.