गडब / अवंतिका म्हात्रे
मुंबई-गोवा महामार्ग हा मानवी चुकांमुळे मृत्यूचे दार बनला आहे. एक तप पूर्ण होऊनही रायगड हद्दीतील महामार्गाचे काम आजही संथगतीने सुरू आहे. महामार्गाचे काम सुरू असलेल्या वडखळ ते महाड या मार्गावरील ४२ ठिकाणी कोणतीही सूचना, वळणबिंदू, दिशादर्शक फलक, रेड रिबन, ब्लिंकर्स काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी लावलेले नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. नॅशनल हायवे विभागाने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अपघातप्रवण क्षेत्र ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना ठेकेदार कंपन्यांना दिल्या आहेत. असे असले तरी नॅशनल हायवे विभाग तितकाच जबाबदार आहे.
महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा फटका हा प्रवाशांना बसत आहे. महामार्गावर कुठेही सूचना, मार्गदर्शक फलक लावले नसल्याने ते अपघाताचे कारण ठरत आहे. राष्ट्रीय रस्ते विभागाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यातील ४२ ठिकाणे ही फलकाविना असल्याने ही ठिकाणे अपघाताची आमंत्रणे ठरत आहेत. रायगड हद्दीत २०२२ सालात अपघातांची संख्या वाढली असून या वर्षात १७२ अपघात झाले आहेत.
सूचनाफलक, दिशादर्शक नसलेली ठिकाणे
■ वडखळ : वडखळ ते अलिबाग, पाटणी
• नागोठणे मीरानगर कामत हॉटेल, वाकण चौकी, गुलमोहर हॉटेल, नागोठणे हायस्कूल रेल्वे फाटक, हायवे नाका बाजारपेठकडे.
• कोलाड सकेळी खिंड उतारावर.
कोलाड रेल्वे ब्रिज, कोलाड रेल्वे स्टेशन, तळवली एमसीएल कंपनी.
■ माणगाव कशेने इंदापूर, ढालघर फाटा, खानजाई मंदिर, इंदापूर बायपास, नवीन ब्रिज मुगवली. गोरेगाव : धनंजय राइस मिल तळेगाव, वडघर फाटा, उसर घर फाटा,
न्यायालयानेही ओढले ताशेरे
महामार्गाचे काम २०११ साली सुरु झाले. बारा वर्षे झाली तरी कामामध्ये कोणतीच 'समृद्धी' झाली नाही. मात्र निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत. न्यायालयानेही महामार्गाच्या कामाबाबत ताशेरे ओढले आहेत.
