गडब/सुरेश म्हात्रे
हल्ली शेती परवडत नाही म्हणून उदरनिर्वाहासाठी शहराकडे जाणारे अनेक नागरिक पहायला मिळतात. मात्र आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात भाड्याने शेती घेऊन त्याच ठिकाणी उदरनिर्वाह भागविणाऱ्या मालती म्हात्रे यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. मालती रामचंद्र म्हात्रे या गेली तीस वर्षे शेती करीत असून शेतात विविध भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. पेण तालुक्यातील खारसापोली हे मालती म्हात्रे यांचे मूळ गाव. हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी आपल्या पतीसह शेती करण्यास सुरुवात केली. मात्र याठिकाणी खारे पाणी असल्याने जमिनीतून विविध पिके घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले गाव सोडले व तळा तालुक्यातील आंबेळी येथे संगम नदी शेजारी २० एकर शेतजमीन भाड्याने घेऊन त्यामध्ये भाजी लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढील खर्च करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने पेण येथील एका ओळखीच्या दुकानदाराकडून त्यांनी उधारीवर बियाणे व फवारणीची औषधे घेतली.
आंबेळी येथे भाड्याने घेतलेल्या जमिनी शेजारी संगम नदी असल्याने त्या पाण्याचा उपयोग करीत त्यांनी जिद्द आणि मेहनतीने भेंडी, मुळा, माट, मेथी, पालक, घ साळी, वांगी, पडवळ,मिरची, दुधी भोपळा यांसारख्या अनेक भाज्यांची लागवड करून भाजीचा मळा फुलवला. व सदर भाजी तळा बाजारपेठेत विकून मिळालेल्या उत्पन्नातून बियाणे व फवारणी औषधांची उधारी देऊन उर्वरित पैशांची बचत करायला सुरुवात केली...
काही वेळा लहरी हवामानामुळे त्यांना शेतीमध्ये तोटाही सहन करावा लागला. मात्र अशा परिस्थितीतही खचून न जाता त्यांनी जिद्दीने शेती व्यवसाय सुरू ठेवला आहे. व आजच्या घडीला यशस्वी शेतकरी म्हणून वीस एकरात कलिंगडे शेतीत जम बसल्यामुळे त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले व पिटसई येथे २० एकर जमीन भाड्याने घेऊन त्या ठिकाणी कलिंगडाची लागवड केली. या कामात त्यांनी आपल्या कुटुंबासह चार माणसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेऊन त्याची घाऊक दराने व्यापाऱ्यांना विक्री केली.
त्यांची वाटचाल सुरू आहे. शेती परवडत नाही म्हणून शेती ओसाड टाकून शहराकडे रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांनी मालती म्हात्रे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर तळा तालुक्यातील अनेक ओसाड माळरानावर भाजीचे असंख्य मळे फुलतील. आणि नागरिकांना आपल्या गावीच हक्काचे रोजगार उपलब्ध होईल.