Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

आमदारांच्या लेकीचा निवडणुकीत माघार!

Responsive Ad Here

गडब/अवंतिका म्हात्रे
कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पक्ष नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उमेदवारीबाबत विविध चर्चा आणि तर्क-वितर्क रंगले होते. पक्षांतर्गत समन्वय, स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत सर्व संबंधित नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होऊन मतभेद दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत बोलताना विकास गोगावले यांनी पक्षाच्या निर्णयाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. पक्ष नेतृत्वाचा प्रत्येक आदेश मान्य असून त्याचे पालन करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून कोणताही वाद शिल्लक राहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जुईली दळवी यांच्या माघारीमुळे कोकण विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेतील संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली असून निवडणुकीत पक्ष एकदिलाने पुढे जाणार असल्याचा संदेश कार्यकर्ते आणि नेत्यांकडून दिला जात आहे. आता या घडामोडींचा कोकणातील निवडणूक राजकारणावर नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.