गडब/सुरेश म्हात्रे
पेणमध्ये शनिवारी कर्नाटकी लाल मिरची दाखल झाली. बाजारभावापेक्षा दुपटीने कमी दरात मिरची मिळत असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच मिरची खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
पावसाळ्यापूर्वी लाल मिरचीसह मसल्याचे पदार्थ खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पाचशेपासून सातशे रुपये किलोने ग्राहक मिरची विकत घेतात. तसेच मिरचीसोबत इतर मसाले पदार्थ खरेदी करण्यासाठीदेखील वेगळा खर्च लागतो. मात्र,पेणमध्ये शनिवारी वाशी आणि वडखळमध्ये सकाळी कर्नाटकी मिरची स्वस्त दरात विक्रीसाठी दाखल झाली आहे. एक किलो मिरची दोनशे रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पुरुषांसह महिलांकडून खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारभावापेक्षा कमी दरात मिरची मिळाल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात मिरची विकत घेतल्याचे चित्र दिसून आले.
बाजारात ५०० रुपयांपासून ७५० रुपयांपर्यंत लाल मिरची विकत मिळते. परंतु, कर्नाटकमधून आलेली मिरची २०० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत मिळाल्याने खूप आनंद वाटला. आर्थिक बचत यातून झाली आहे.
- नरेंद्र जाधव,ग्राहक
कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन काढले जात आहे. अलिबागमध्ये पाच टनहून अधिक लाल मिरची विक्रीसाठी आणली आहे. ग्राहकांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संजू यादव,विक्रेते