गडब / अवंतिका म्हात्रे
मुंबई -गोवा महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असतांनाच पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड या ठिकाणच्या असणाऱ्या आजुबाजूच्या अनेक गावांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागत असतांनाच पेण तालुक्यातील कासू विभागातील खारपाले बस थांब्यासमोरील सर्व्हिस रोडवरील रस्त्याचे काम हे अनेक दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे एस टी बस या बस थांब्यावरुन न जाता तेथे असलेल्या उड्डाण पुलावरून जात होत्या. पंरतु सद्यपरिस्थितीत येथिल रस्त्याचे काम पुर्ण झाले असुनसुद्धा आताही एस टी बस या बस थांब्यावरुन न जाता पुलावरूनच जात आहेत. त्यामुळे एस टी बस पुन्हा खारपाले बस थांब्यासमोरुन जाण्यात याव्यात यासाठी खारपाले गावातील जवळपास ५० विद्यार्थी व पालकांच्या सहीचे असलेले निवेदन नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने मंगळ.( दि.३१) रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पेण यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,, खारपाले गाव हे महामार्गावरील बस थांब्यावरुन आतमध्ये ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना गावातुन बस थांब्यापर्यंत येण्यासाठी अर्धा कि.मी.चेअंतर चालत यावे लागत आहे. त्यातच काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या बस थांब्यापर्यंत एस टी बस येत नसल्यामुळे गावातील विद्यार्थी तसेच वयोवृद्ध व्यक्तींना गावाजवळुन गेलेल्या उड्डाणपूलाच्या पुढे ३०० मीटर अंतर आणखी चालत जावे लागत आहे. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे
पंरतु सद्यपरिस्थितीत या रस्त्याचे काम पुर्ण झाले असुन वाहतूक देखिल सुरळीत सुरु आहे. तरीसुद्धा एस टी बस खारपाले बस थांब्याच्या बाजुने न जाता उड्डाण पुलावरूनच जात आहेत. दरम्यान सध्या मुलांच्या परिक्षाही चालु आहेत. त्यामुळे शाळेय विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध व्यक्तींना खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खारपाले गावाच्या बस थांब्यावरुन एस टी बस सेवा सुरु करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ पेण शाखेच्या व्यवस्थापिका अपर्णा वर्तक यांना नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षा शैला तुरे, रायगड जिल्हा सचिव प्रमोद तुरे, व पेण तालुका उपाध्यक्षा स्वाती मोरे यांनी दिले आहे. यावेळी पेण डेपोच्या व्यवस्थापिका अपर्णा वर्तक यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले.