Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

काँग्रेसमधील धुसफुस भाजपाच्या पथ्यावर!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

   भारत जोडो नफरत छोडो, हे ब्रीद घेवून काँग्रेसचे युवराज राहुल गांधी उर्फ आरजी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा केवळ रस्ता पायाखाली घालून एखादा इव्हेंट केलेला नाही. तर धर्म आणि जातीपातीच्या आक्रमणाखाली दबलेल्या मानवी समूहाला राहुल गांधींनी जगण्याचे नव्याने प्रोत्साहन दिले आहे. त्यांची ही यात्रा भविष्याला कलाटणी देणारी, क्रांतीकारी ठरणार आहे. दुर्दैव असे की, राहुल गांधी यांचे विचार पेलण्याची क्षमता असलेले नेते काँग्रेसमध्ये अभावानेच आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. नेमकी याच गोष्टीचा फायदा उठवत विरोधी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने काँग्रेसमधील तरुणांना पक्षात घेत काँग्रेस केवळ खिळखिळी केली नाही तर काँग्रेसचे भवितव्य ते यानिमित्ताने चोरत आहेत. हे कॉग्रेसच्या दरबारी नेत्याच्या लक्षात येत नाही.
अखिल भारतीय काँग्रेसला पुर्वी स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक फारसे रुचले नाहीत, पटले नाहीत, तो भाग वेगळा. काँग्रेस म्हणजे विचारांचा वारसा, काँग्रेस म्हणजे त्यागाचा, बलिदानाचा आरसा. काँग्रेस म्हणजे देशसेवेचा पाईक, काँग्रेस म्हणजे संवादाचा माईक. परंतु, अलिकडे गांधी घराण्यावर झालेल्या व्यक्तिगत आरोपांनंतर काँग्रेसने ज्या पद्धतीने पेटून उठणे आवश्यक होते, ते होवू देण्याअगोदरच भाजपाने काँग्रेसमधील सक्रिय तरुणांच्या खुर्चीला भक्कम दोरखंड बांधून त्यांच्या पक्षात ओढून घेतले. ते काम भाजपा अखंडपणे, अविरतपणे आजही निर्धोक करीत आहेत. आज जरी एक सत्यजित तांबे तिकडे गेले असले तरी फडणवीस यांनी गळ टाकून कोल्हापूरच्या बंटी पाटलांसह, सांगलीच्या विश्वजीतांवर प्रचंड दबाव वाढवून भाजपाचे दरवाजे उघडून ठेवले आहेत. हे केवळ दोन नेते नाहीत. तर महाराष्ट्राच्या काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांशी सोयरिक जुळवून ठेवली आहे. योग्य वेळी त्यांचा कॅरेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस करतील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्यादे कोण हलवितो, हे लक्षात येत नाही असे नाही. त्यांची अडचण अशी आहे की, सध्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे कट्टर राजकिय वैरी आहेत. तसे असले तरी राजकारण आणि प्रेमात फक्त स्वार्थ टिकवायचा असतो. आत्मभान वगैरे वर्तमानपत्रातील मथळ्यापुरते ठळक राहते. थोरात यांच्या वडिलांनी जी मोट बांधणी केली आहे, ती त्यांच्या पथ्यावर आहे. मूळचे हे कम्युनिष्ट घराणे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटलांनी थोरातांच्या वडिलांना पक्षात आणले आणि आमदार केले. त्यानंतर बाळासाहेब थोरातही एकदा सुरुवातीला अपक्ष राहिले आणि निवडून आले. पक्षाने त्यांना सात वेळा आमदारकी दिली आणि त्यांनी ती राखली. महसूलमंत्री, राज्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी महत्वाची पदे दिली. आज पक्षाला त्यांची गरज असताना त्यांना भाजपा गोड वाटत असेल तर मग त्यांच्या संस्था अडचणीत असतील किंवा स्वतः थोरात यांचा कुठे तरी पाय घसरला आहे का, याची चर्चा सुरु आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांचा छूपा वाद आहे. नाना भाजपातून आले आहेत. ते प्रचंड आक्रमक आहेत, हे काँग्रेसच्या नजरेतून पापाचे लक्षण आहे. तिथे थंडा करके खावो, ही संस्कृती रुजवली गेली आहे. शिवाय नानांवर पैसे घेवून पदे वाटप केली जात असल्याचा मसाला हायकमांडला पुरविला गेला आहे. नाना हुशार आहेत, पण तितकेच आततायी स्वभावाचे आहेत, अशी काही श्रेष्ठींची ओरड आहे. त्यांच्याविरोधात मोठं चक्रव्यूह रचले गेल्याने कदाचित त्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. आता लोकसभेचे सभागृह सुरु आहे. नुकतीच भारत जोडो यात्रा संपुष्टात आली आहे. लोकसभेचे अधिवेशन आणि नंतर राज्यातील अधिवेशन आहे. तोपर्यंत हा वाद चिघळत ठेवला जाईल की तत्पूर्वी एक घाव दोन तुकडे करतील? खरे तर तातडीने निर्णय ही पक्षात प्रक्रियाच नाही. त्यामुळे तात्पुरता पडदा टाकून पेल्यातील वादळ शमविले जाईल. पण ते भविष्यात धोकादायक ठरु शकते. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काही झाले तरी राहुल गांधी आणि परिवाराला विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत. तरीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेतले गेले आहे. दुसरीकडे पटोले- थोरात वादाने अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण गट खुशीची गाजरे खात आहे. पृथ्वीराज काय खिंड लढवतात त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस टिकवण्यापेक्षा त्यांच्या मुलांचा पक्षात राजकिय व्रतबंध करुन घ्यायचा आहे. अनेक नेत्यांची मुले तिकिटाच्या रांगेत आहेत. पक्षच टिकला नाही तर त्यांच्या मुलांचे भवितव्य अधांतरी आहे. भारत जोडो यात्रेपुर्वी नेतेही पक्षाच्या वाटचालीसह एकुणच काँग्रेसबद्दल साशंक होतेच. परंतु, राहुल यांच्यासोबत विविध समाजातील विचारवंत, लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, नेते, कलाकार असे संस्कृतीचे खरे रक्षक सहभागी झाले आणि भाजपा नेतृत्वाची डोकेदुखी वाढली. त्यातच गांधींनी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला तो त्यांच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे दुखणे देशातील सत्ताधारी भाजपा आहे. त्यांच्याशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे राहुल लढत असताना महाराष्ट्रातील प्रगल्भ आणि बराच वेळ सत्तेचा मलिंदा लाटलेल्या नेत्यांची समाधीवृत्ती नेमकी कशात आहे, ते या निमित्ताने समोर येत आहे.
सगळ्याच पक्षातील नेते असे अधीर असतात. काही जण धोतराच्या व्यवसायात कमावतात आणि लुगड्यात गमवतात. काँग्रेस याला अपवाद तरी कशी असेल? नेत्यांमधील संवादाचा अभाव आणि कार्यकर्त्यांना फक्त बॅनर लावण्यासाठी वापरुन घेतले गेले तर पक्षाच्या हाती फक्त निर्बुध्दांची टोळी लागेल. विचारवंत, प्रज्ञावादी आणि संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्वाचे कार्यकर्ते कधीच कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्यास राजी होत नाही. यामुळे मधल्या काळात पक्षाला ओहटी लागली, ती कसर भरुन काढता आली नाही. त्याला आणखी अनेक कंगोरे आहेत. मुळात राज्यात काँग्रेस वाढू द्यायची नाही, ही कुणाची भीष्मप्रतिज्ञा आहे आणि ताटात घेवून काँग्रेसच्या वाट्याला खरकटे कोण देतो, हे सांगण्याची नव्याने गरज नाही.
राज्यातील काँग्रेससमोर प्रश्न अनेक असले तरी त्यांचे उत्तर केवळ नेतृत्व बदलात आहे. असे मानायचे कारण नाही. उद्या पटोले यांना बदलले तरी लगेच फार मोठे बदल पक्षात घडतील याची शाश्वती देता येत नाही. एक मात्र होऊ शकते ते असे की, भाजपा काँग्रेसमधील सक्रिय तरुणांच्या मागे धावत आहे. त्यांना रोखण्यासाठी नवा पर्याय म्हणून बंटी पाटील, यशोमती ठाकूर किंवा अगदी नितीन राऊत यांच्यापैकी कुणाची वर्णी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी लावून नाना, थोरात आणि अशोक चव्हाण यांना केंद्रीय कार्यकारणीत समाविष्ट केल्यास राज्यातील काँग्रेस भविष्यात तग धरू शकते इतका स्पष्ट अर्थ या घडामोडींतून समोर येत आहे.
रात्र वैऱ्याची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या महायुद्धाची जय्यत तयारी असुरीपद्धतीने आखली आहे. तोडा आणि फोडा राजनिती सुरु आहे. त्यातून भाजपाचे पारंपरिक कार्यकर्ते, पदाधिकारी सत्तेच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. काही वर्षांनी भाजपा मूळपदावर येईल. शामाप्रसाद मुखर्जी आणि इतरांची जडणघडण ज्या काँग्रेसमधून झाली. पुढे त्यांनी जनता पक्ष ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास केला. ती भारतीय जनता पार्टीसुद्धा भविष्यात काँग्रेससारखी फुटीच्या शापाने त्रस्त होईल. कारण निसर्गाचे वर्तुळ पुर्ण व्हावे लागते. त्या पद्धतीने भाजपाची वाटचाल सुरु आहे. दुर्दैव असे की तोपर्यंत अनेक प्रादेशिक राजकिय पक्षांसोबत काँग्रेसचे महाकाय टायटॉनिक जहाज बुडवायला स्वपक्षातील नेतेच कारणीभूत ठरत आहेत.