✍🏻 गडब / अवंतिका म्हात्रे
पेठ-खारघर
त रायगड जिल्ह्यातील नामवंत ऑक्टोपॅड वादक, तसेच पेठ-खारघर परिसरातील आदरणीय व्यक्तिमत्त्व सुभाष पांडुरंग वास्कर यांचे रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने वास्कर कुटुंबीयांसह संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सुभाष वास्कर हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपल्या ऑक्टोपॅड वादनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे कुशल व मनमिळाऊ कलाकार होते. ‘स्टार म्युझिकल ऑर्केस्ट्रा’चे ते महत्त्वाचे वादक होते. आपल्या कलेसोबतच प्रेमळ स्वभाव, आपुलकीची वागणूक आणि सहकार्याची भावना यामुळे त्यांनी संगीत क्षेत्रातील सहकाऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या अचानक जाण्याने वास्कर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ-बहिणी तसेच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
“सुभाष वास्कर यांच्यासारखा मनमिळाऊ, प्रेमळ आणि समर्पित कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्याने स्टार म्युझिकल ऑर्केस्ट्राचे तसेच संपूर्ण संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,” अशा भावना व्यक्त करत स्टार म्युझिकल ऑर्केस्ट्राचे निर्माता व गायक रविंद्र जाधव यांनी वास्कर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुभाष वास्कर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक गुणी आणि मनमिळाऊ कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असून, त्यांच्या आठवणी सदैव सहकाऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.