गडब / अवंतिका म्हात्रे
रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि विश्वासाचा सण आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा हा सण भारतीय संस्कृतीतील एक सुंदर परंपरा मानली जाते. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते आणि भाऊ तिच्या सदैव सोबत राहण्याचे वचन देतो.
बहिण-भावाचे नाते हे केवळ रक्ताचे नाते नसून त्यामध्ये प्रेम, काळजी, माया, विश्वास आणि गोड भांडणेही असतात. लहानपणीच्या आठवणी, एकमेकांसोबत केलेली मजा, रुसवे-फुगवे आणि संकटाच्या वेळी दिलेली साथ यामुळे हे नाते अधिक घट्ट होत जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिच्या सुख-दुःखात कायम साथ देण्याचे आश्वासन देतो. मात्र रक्षाबंधनाचा खरा अर्थ केवळ भेटवस्तू किंवा राखीपुरता मर्यादित नसून एकमेकांची काळजी घेणे आणि आयुष्यभर नाते जपणे हा आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असला तरी रक्षाबंधनाचा सण कुटुंबाला एकत्र आणतो. या दिवशी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि बहिण-भावातील प्रेम अधिक दृढ होते.
रक्षाबंधन म्हणजे प्रेमाच्या धाग्याने बांधलेले एक सुंदर नाते. हा धागा मनगटावर काही दिवस राहतो; पण बहिण-भावाच्या मनातील प्रेम आणि आपुलकी आयुष्यभर टिकून राहते. म्हणूनच रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा सण आहे.