Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे बिनविरोध; महाविकास आघाडीला मोठा धक्का !

Responsive Ad Here

गडब/अवंतिका म्हात्रे
     राज्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसून आली होती. काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजीही समोर आली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या मनधरणीमुळे आणि पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा समावेश असलेल्या महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्याविरोधात कोणताही सक्षम प्रतिस्पर्धी शिल्लक न राहिल्याने त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. अनिकेत तटकरे हे खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत.
अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामुळे कोकणातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनेही महायुतीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
महायुतीच्या या यशामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काळात त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.